वासुदेव (लोक कलाकार):
दान पावलं बाबा दान पावलं
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ ||
वासुदेव महाराष्ट्रातील कला जपणारी वैशिष्ट्यपूर्ण जात. गावात सकाळच्या वेळी घरोघर जाऊन पांडुरंगावरील अभंग किंवा गवळण गात भिक्षा मागणारा आणि समाज प्रबोधन करणारा हा लोकवंत कलाकार आहे.
डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, पायात घुंगुर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष असतो. वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेष घेतलेला दिसत आहे.
भल्या पहाटे नाथमहाराज, ग्यानबा तुकाराम, सोपानदेव, ज्ञानेश्वर माउली, रामाचा नामघोष करत गावो गावी फिरत असतात. अंगणात येऊन गृहिणी वासुदेवाला धान्य देतात आणि एक गिरकी घालत सर्व देवदेवतांची नावे घेत ’दान पावलं’ असं म्हणत गीत गायला सुरुवात करतो. पूर्वी गावात संदेश किंवा बातमी पोहचवण्याचं ते काम करत असत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ते हेरगिरी म्हणून पण काम करत असत. वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. गावोगावी भरणाऱ्या जत्रांत वासुदेव दिसतात.
कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . वासुदेवाची सुमधुर अशी गीते त्यांच्या तोंडून आपल्याला क्वतीतच ऐकायला मिळत आहे.
असाच एक क्षण मोबाइल मध्ये टिपण्याची संधी मिळाली
No comments:
Post a Comment